top of page

३ .लाडमोड टेकडीवरील स्थान

Updated: Jun 28, 2023

निधीवास या ठिकाणी पाच महिन्यांपेक्षाही दीर्घकालीन वास्तव्य झाले.

ree

प्रस्तावना

निधीवास या ठिकाणी पाच महिन्यांपेक्षाही दीर्घकालीन वास्तव्य झाले. परंतु येथील अत्यंत महत्त्वाची स्थाने नमस करण्याची परंपरा कालौघात मावळत गेली असावी का? खूण म्हणून या ठिकाणी पूर्वजांनी ओटे मांडले होते का? अथवा ओटेविरहित मूळ अवस्थेतच स्थान नमस करण्याची परंपरा ठरावीक काळापर्यंत होती; आणि ती परंपरा कालांतराने खंडीत झाली असावी का? इत्यादि प्रश्नांची उत्तरे शोधणे हा संशोधनाचा विषय आहे. विसाव्या शतकात नेवासा खुर्द येथील लाडमोड टेकडीवर पुरादित्य म्हटल्या जाणाऱ्या उपलब्ध स्थानाची नोंद काही ग्रंथांत आढळते, परंतु स्थानपोथीत पुरादित्य या स्थळाविषयीच्या दिशानिर्देशाविषयीचे सुक्ष्म निरिक्षण केले असता त्याचा निर्देश नेवासा बुद्रुक येथे आढळतो. लाडमोड टेकडीवरील स्थळाची दिशा स्थानपोथीतील दिशानिर्देशाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून सांप्रत पुरादित्य म्हटले जाणारे स्थान ते पुरादित्य नसून विहरणस्थान आहे असे म्हणावे लागेल. परंपरेने हे स्थान आपण नमस्करीत जरी असलो तरी ते विहरण स्थान आहे असेही म्हणावयास स्थानपोथीत वा चरित्रपोथ्यांत कोणताच पाठपुरावा मिळत नाही. प्रवरेचा प्रवाह पूर्वी गावाच्या दक्षिणेकडून होता. पुढे काळांतराने गावाच्या पश्चिमेस एक जवाएवढी खिंड पडली आणि तिचा प्रवाह दोन्ही गावांच्या मधून झाला. त्यामुळे गावाचे खूर्द आणि बुद्रुक असे दोन भाग झाले. अशी येथील रहिवाशी ग्रामस्थांमध्ये समजूत आहे. या समजूतीतही मतभेद आहेत.१ काही वयोवृद्ध गृहस्थांचे म्हणणे आहे की, प्रवरेच्या मूळ प्रवाहात काही बदल झाला नाही. मग प्रवरेच्या प्रवाहात बदल झाला या समजूतीवरूनच म. दत्तराजदादा शेवलीकर यांनी त्यांच्या स्थानमार्गदर्शकात ही स्थाने नामशेष झाली असे म्हटले आहे. परंतु ती स्थाने नामशेष झाली नसून ती नेवासा बुद्रुक येथे आहेत. आणि ती बुद्रुक येथेच कशी आहेत याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. येथील ग्रामस्थांचा प्रवरेच्या प्रवाहात बदल झाला अशी समजूत का झाली असावी याचे कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवरेचा प्रवाह बदलला अशी समजूत होण्यास कारण असे की, लाडमोड टेकडीवरील पुरादित्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेच्या मागून असलेला ओढ्यासारखा जलप्रवाह नेवासा खुर्द गावाला वळसा घालून पुन्हा प्रवरेत मिळतो. हा कोण्या काळात निर्माण झाला असेल याची माहिती मिळत नाही. परंतु मराठा, मुघल वा निजामशाहीत (साधारणपणे पेशवाईच्या काळात) झाला असावा. हा प्रवाह तत्कालीन राजवटीत शहरास पाणी पुरवठा व्हावा या हेतूने निर्माण केला असावा अशी दाट शक्यता वाटते. गावाच्या पश्चिमेस असणारा भूभाग मुळातच उंच असल्याने तसे करणे शक्य झाले. या प्रवाहाला पाहून नदीच्या प्रवाहात बदल झाला अशी काही ग्रामस्थांची समजूत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाडमोड टेकडी या स्थळात डेक्कन कॉलेज, पुणे तर्फे पुरातत्त्वज्ञ ह.धी.सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात आले (१९५४-६०). सदर उत्खननातून प्रागैतिहासिक काळ, उत्तर पुराश्म काळ, मध्य पुराश्म, ताम्रपाषाण युग नंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, रोमन कालखंड, बहमनी कालखंड अशा विविध कालखंडांतील संस्कृतींचे अवशेष दिसून आले असे त्या संशोधकांचे म्हणणे आहे.

या स्थानाविषयीची एक घटना

या स्थानासंदर्भात एक घटना घडली. आणि त्या घटनेचे साक्षीदार होते श्रीमयंकराज पंजाबी. त्यांनी ती घटना श्रीगुरुवर्य मोठेबाबांना सांगितली होती. ती घटना पुढीलप्रमाणे- या स्थानाचं बांधकाम करावं असं एका भिक्षुकांना वाटत होते. त्यासाठी तसा हेतू धरून त्यांनी या पांढरीवर वास्तव्य केलं. अनुष्ठान केलं आणि एके दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात ते म्हणतात, ‘देवा! मला हे स्थान बांधायचंय.’ मग त्यांना स्वप्नातच एक जागा दिसली आणि ‘या ठिकाणी खोद.’ असा दृष्टांत झाला. त्यांनी स्वप्नात दाखवलेल्या जागेवर खोदकाम केलं. त्या खोदकामात त्यांना भूमिगत धनद्रव्याचा लाभ झाला. त्यांनी या मिळालेल्या धनलाभातून, पैशातून स्थानाचं बांधकाम करायला पाहिजे होतं, पण ते भलतंच काहीतरी करीत बसले. त्यामुळे त्यांचा अधःपात झाला. ममदापुरला असणाऱ्या एक वयोवृद्ध तपस्विनी या स्थानाविषयी सांगत असत की, ‘आम्ही लहानपणी जात असू तेव्हा तिथला ओटा फार उंच टेकडीवर होता. तो नमस्करण्यासाठी दगडगोटे धरून वर चढावं लागत होतं.’ म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या काळात या ठिकाणी एकच ओटा होता. पुढे कालांतराने कोण्या महंतांनी ही जागा समतळ करून त्यावर तीन ओटे मांडले.

ज्ञानेश्वर मंदिर

या भागातच येथून दक्षिणेस दोन फर्लांग अंतरावर ज्ञानेश्वर मंदिर आहे. पूर्वी त्या ठिकाणी एक पुरातन मंदिर होते. त्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात शंकराचार्यांच्या श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्याचे मराठीत, प्राकृतामध्ये ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) या नावाने ओवीबद्ध भाषांतर केले. त्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली त्या खांबाला पैस असे म्हटले जाते. त्या खांबावर करवीरेश्वरास नंदादीप लावण्याविषयी दिलेल्या वर्षासनाबाबतचा एक लेख कोरलेला आहे. त्यावरून या ठिकाणी करवीरेश्वराचे (कणैरेश्वराचे) देऊळ होते. असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु ते याच ठिकाणी होते याचा कोणताही सबळ पुरावा नाही. पैस खांबाच्या भोवती बांधण्यात आलेल्या नव्या मंदिराचे उद्घाटन १९६३ साली झाले.


Comments


Commenting on this post isn't available anymore. Contact the site owner for more info.

स्थानशोधनी

©2023 by स्थानशोधनी. Proudly created by Shri Devdatt Ashram, Jadhavwadi

bottom of page