

त्र्यंबकेश्वरातील स्थाननिर्देशाचे ऐतिहासिक मानचित्र


प्रास्ताविक
त्र्यंबक येथील स्थानांचा निर्देश समजण्यास कठीण आहे. परंतु स्थानपोथ्या आणि चरित्रपाठातील वर्णनाद्वारे स्थाननिर्देश समजण्याचा एकमेव मार्ग आपल्या हाताशी आहे. चरित्रपाठांप्रमाणेच स्थानपोथ्यांचे अनेकविध पाठ आहेत. एखाद्या पाठातील एखाद्या वाक्याचा असलेला वेगळेपणा आपल्याला स्थानाच्या योग्य जागी घेऊन जातो. हेच त्या पाठाचे अनोखेपण इतर पाठांच्या तुलनेत बाजी मारून जाते. म्हणूनच पाठांच्या वैविध्यांचा स्थानशोधणीसाठी बहुमोल उपयोग होतो. हाच अनुभव जवळ जवळ प्रत्येक पाठांच्या बाबतीत आल्यामुळे अमूक एक स्थानपोथी परिपूर्ण आहे किंवा अमूक एक स्थानपोथी अपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. सर्वच पाठ आपापल्या परीने परिपूर्ण आणि समृद्ध आहेत. अर्थात त्यांच्या या वैशिष्ट्यांचा स्थानशोधणीच्या कार्यात मौलिक असा झालेला उपयोग तनामनाला उभारी देऊन जातो.
ऐतिहासिक काळातील त्र्यंबकेश्वर
सर्वज्ञांच्या काळात, महाराष्ट्रात यादव राजवटीच्या काळ ात त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे मूळ स्थितीत होते. मात्र या मंदिरालाही अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागले आणि यादवांच्या राजवटीबरोबर हे मंदिर देखील आपली मूळ स्थिती हरवून बसले.

त्यानंतर हा भाग मुस्लीम अधिपत्याखाली गेला. इसवी सन १६२२ मध्ये दिल्लीच्या शहाजहान बादशहाच्या दफ्तरी त्र्यंबकचा उल्लेख आढळतो. पुढे निजामाच्या मदतीने शहाजीराजांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्र्यंबकेश्वर मंदिराची डागडुजी केली होती, अशी माहिती जुन्या लोकांकडून मिळते, मात्र शहाजीराजांची ही सत्ता फार काळ तग धरू शकली नाही. सात-आठ वर्षातच मुघलांनी नाशिक-त्र्यंबक परिसरावर आपली सत्ता लादली. पुढे इ.स.१६७० मध्ये साल्हेरच्या युद्धात हा परिसर मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात सामील केला.

छत्रपती संभाजीराजांच्या पश्चात मातबरखानाने फितुरी करून त्र्यंबकचा किल्ला मिळवला. या किल्ल्याची जबाबदारी औरंगजेबाने करीम कुलीखानाकडे सोपविली.

या करीम कुलीखानाच्या काळातच त्र्यंबकेश्वर नगरात प्रचंड विध्वंस करण्यात आला. यात त्र्यंबकेश्वर देवालयाची प्रचंड हानी झाली.
(‘हिस्ट्री ऑफ औरंगजेब’ या पुस्तकात प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी या घटनांचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, १६९० मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडले. मंदिराचेही मोठे नुकसान झाले आणि त्यावर मशिदीचा घुमट बनवला होता. औरंगजेबाने नाशिकचे नावही बदलले होते. (नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद असे ठेवले होते), पण १७५१ मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केले, त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.)
ब्रह्मगिरी पर्वतावरचा त्रिंबक गड हे त्या काळातल्या राजकीय घडामोडींचं केंद्र होते. देवगिरीच्या राजा रामचंद्रदेव यादव याच्या अधिपत्याखाली काही काळ हा गड होता. त्यानंतर त्याची बरीच हस्तांतरे झाली. इ.स.१६२९ मध्ये हा किल्ला शहाजीराजांच्या ताब्यात असल्याची नोंद मिळते. शहाजीराजांकडे नासिक, संगमनेर, जुन्नर आणि कोकण हा प्रदेश होता, मात्र शिवाजी राजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात हा गड दाखल झाला. इसवी सन १६७२ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड जिंकला होता, मात्र या किल्ल्यावरील मराठ्यांचे अधिपत्य फार काळ टिकले नाही. इसवी सन १६८२ च्या सुमारास हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. इ.स. १७१६ मध्ये छत्रपती शाहूराजांनी मुघलांकडे या किल्ल्याची मागणी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीला नकार देण्यात आला. सन १७२०ला हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७४८-४९ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकगड जिंकून कोळवण मोहिमेला आरंभ केला. पुढे इसवी सन १७५१ मध्ये त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी हा गड जिंकून पेशवाईत दाखल केला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराला साकडे घातले होते. गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस फेडल्याची नोंद पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मिळते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज या गडाचे भग्नावशेष आढळतात.
(सद्यस्थितीतील त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम १७५५ मध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या सहामाहीत (सुमारे डिसेंबर) श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी सुरू केले आणि १७८६ मध्ये ते पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ३१ वर्षाचा कालावधी लागला आणि त्यावेळच्या चलनानुसार १६ लाख रुपये खर्च आला. आजच्या काळात हा खर्च अब्जोवधीच्या घरात असेल).
इ.स.१७५४ मध्ये मंदिराच्या जागेवर बांधलेली मशीद पाडून नानासाहेब पेशव्यांनी नव्याने मंदिर बांधण्याची सुरुवात केली. त्यानंतर इ.स.१७८५ मध्ये सवाई माधवरावांच्या काळात हे बांधकाम पूर्ण झाले. याच काळात परधर्मीयांनी नष्ट केलेली मंदिरे, तीर्थे यांचीही मराठा सरदारांनी पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे पेशव्यांनीच निर्माण केलेले असून ब्रिटिश काळात रघुनाथराव विंचुरकरांनी त्याची चुन्याने टीपगारी केली (गळती बंद केली), कळस बसविले व रथ निर्माण करून जमीन दान दिली, अशी माहिती मंदिरातील शिलालेखावरून मिळते. या मंदिराच्या निर्मितीत अहिल्यादेवी होळकरांचे योगदान किती होते, हे स्पष्ट होत नाही. मात्र, त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तटबंदीला लागून असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते.
दि. २४ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांनी तोफांचा भडीमार करून त्र्यंबक किल्ला मराठ्यांकडून घेतला.
अर्थात सद्यस्थितीतील असलेले त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे जीर्णोद्धारित आहे. सर्वज्ञांच्या काळात त्याची जी यथास्थिती होती ती राहिलेली नाही. मूळ मंदिराच्या स्थितीपेक्षा आताचे मंदिर मूळ जागेवरच परंतु विस्तारलेल्या स्थितीत आहे. त्यामुळेच मंदिरातील चौकाची नेमकी जागा निश्चित करताना अडचण येऊ शकते. मात्र गाभारा हा मूळ जागेवरच जसाच्या तसाच आहे. हीच परिस्थिती नाशकातील सुंदर नारायणाच्या मंदिराबाबत देखील आहे. त्र्यंबकेश्वर काय किंवा सुंदर नारायण किंवा कोणतेही हिंदू मंदिर असो! वैदिक शास्त्रात नियमच असल्याने वैदिक लोक गाभाऱ्याची अथवा शिवलिंगाची मूळ जागा कायम ठेवतात.
यादवकालीन त्र्यंबकेश्वर मंदिर
.png)
सर्वज्ञ अंजनेरीहून त्र्यंबकला आले तेव्हा या भव्य देवालयात जगतीच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून आत आले. त्यांनतर गाभाऱ्यात लिंगाच्या दक्षीणेस आसन झाले. लिंगास श्रीकराने स्पर्श केला. माधानात वीडा धुवून त्र्यंबकास वाहिला. आणि मग देवालयाच्या चौकात आले. तिथे काही वेळ आसन झाले. आणि मग जगतीच्या वायव्येस असणाऱ्या मढात अवस्थान झाले.
स्थानपोथीतील वर्णनानुसार या देवालयाची एकंदरीत रचना अशी होती की, या देवालयाच्या जगतीस पूर्व, उत्तर, दक्षिण असे तीन दारवठे होते. त्याचप्रमाणे देवालयासमोरील मंडपासही पूर्व, उत्तर, दक्षिण असे तीन दारवठे होते. देवळाच्या नैर्ॠत्येस विहिर होती. त्या विहिरीचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख होते. येथील अवस्थानाच्या जागेविषयी स्थानपोथ्यांत तीन मतभेद आढळतात. परशरामबासांच्या वासनेप्रमाणे त्र्यंबकाच्या जगतीमध्ये वायव्य कोणट्यात मढ होता. तर रामेश्वरबासांच्या वासनेप्रमाणे जगतीच्या वायव्य कोणट्यासच परंतु जगतीच्या बाहेरून मढ होता. आणि हिराइसांच्या वासनेप्रमाणे गौतमाळ्याच्या वायव्य काठावर होता. परंतु काही चरित्रपाठातील वर्णनाप्रमाणे हे मतभेद नाहीत. यातील त्र्यंबकाच्या जगतीमध्ये वायव्येस असणारा मठ हा अवस्थानाचा होय. तर जगती बाहेरील मढात आणि गौतमाळ्याच्या काठावरील मढात एक एक वेळ पूजा आरोगणा झाली. अर्थात या तिन्ही मठांत प्रसंगानुसार विहरण झाले, असे त्यांचे मत आहे.
येथील बाह्य प्रदेशाचा स्थानपोथीतील निर्देश आपण पाहू. त्र्यंबक देवालयाच्या दक्षिण दारवठ्याच्या बाहेर लागूनच गोदावरी आहे. त्यास घाट होता. ‘‘तीनी रीगावे : घाटीचे :’’ त्यास तीन बाजूंनी पायऱ्या होत्या. आग्नेयेकडे १४ पायऱ्या, दक्षिणेकडे १४ पायऱ्या आणि नैऋत्येकडे १२ पायऱ्या.
सांप्रत त्र्यंबकेश्वर मंदिरात नेमकी स्थलनिश्चिती असणाऱ्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणी आपण नमस्कार करू शकतो. एक गाभाऱ्यात जाण्यासाठी असणारा उंबरवट त्यावर आपण नमस्कार करू शकतो. तो उंबरवट मूळ जरी नसला तरी जागा मात्र तीच आहे. आणि दुसरे ठिकाण त्र्यंबकेश्वर लिंगाच्या दक्षिणेकडील जागा ही देखील नमस्कारी आहे. परंतु या जागेवर जाण्यास मात्र अटी आहेत. येथील ट्रष्टमधील नेमलेल्या व्यक्तीच जावू शकतात. आणि शूचिर्भूत व्यक्तीच या ठिकाणी जावू शकतात असा येथील नियम आहे.
येथील स्मरणीय, आठवणीय जागा- देवळाच्या चौकातही सर्वज्ञांना आसन झाले होते, परंतु मूळ मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर बदललेच्या चौकाचा विस्तार किती मोठा केला हे कळायला मार्ग नसल्याने तो फक्त आपण आठवू शकतो. तसेच येथील अवस्थानाच्या गुंफेची जागा ही जगतीच्या वायव्य कोपऱ्यात होती. ती जागा सांप्रत मोकळी आहे. येथील वास्तूचा कोणताच मागमूस नसल्याने ही जागा देखील आठवणीय आहे. त्याचप्रमाणे जगतीच्या बाहेरील गुंफेची जागाही आठवणीय आहे.
गौतमाळे




गौतमाळ्याच्या काठावरील मढाचा निर्देश करताना स्थानपोथीकारांनी ‘‘त्र्यंबका दक्षिणे तथा नैऋत्यकोनी गौतमाळें : त्याचिये पाळीवरी गुंफा पूर्वाभिमुख : तेथ अवस्थान’’ असा केला आहे. परंतु हाच निर्देश दुसऱ्या स्थानपोथीकारांनी ‘‘गौतमाळांचीए उतरीली पाळी वैजनाथाचें देउळ पुर्वामुख पाइरीया :५। देउळामागां तळयाचेया घाटा पसीमीली सेवटी पाळीवरी गुंफा पुर्वामुख :’’ याप्रमाणे केला आहे. आजही हे वैजनाथाचे देउळ गौतमाळ्याच्या काठावर आहे. परंतु ते जिर्णोद्धारीत आहे. मूळ देवळाचे अवशेष समोरील परिसरात विखुरलेले आहेत. या देवळाच्या पश्चिमेकडे गौतमाळे घाटाच्या पश्चिमेकडील शेवटास काठावर ही गुंफा होती. सद्यस्थितीत या गुंफेचा कसलाही मागमूस राहिलेला नाही त्यामुळे ही जागा केवळ आठवणीय आहे.
(हा तलाव ६०० x ४०० फूट आहे आणि श्रीमंत पंडित झाशीवाले यांनी ५०,०००.०० रुपये खर्चून बांधला आहे.)
बकुळ
सर्वज्ञ ब्रह्मगीरीवरून परतले तेव्हा गौतमाळ्याच्या पूर्वेकडील काठाच्या पूर्वेस असणाऱ्या बकुळाच्या झाडाखाली सर्वज्ञांना आसन झाल्याचा उल्लेख चरित्रपोथ्या तथा स्थानपोथ्यांत येतो.
१. स्थानपोथी- ‘‘गौतमाळेयापुर्वे पांडा :७: चेनि माने बकुळाचें झाड :’’
२. चरित्रपोथी- ‘‘मग बकुळासि बीजें केलें : बकुळीं पूर्वाभिमुख नावेक आसन जालें : मग गुंफेसि बीजें केलें :’’
सांप्रत ही जागा गौतमाळ्याच्या पूर्वेस आहे. परंतु ती केवळ आठवणीय आहे.

गोदावरी काठावरील महादेव मंदिर
त्र्यंबक मंदिराच्या पूर्वेस काही अंतरावर गोदावरीच्या दक्षिण काठावर एक जुने महादेव मंदिर आहे. हे प्राचीन पुरातन मूळ महादेव मंदिर म्हटले जाते आणि असेलही. परंतु त्या देवळाचा निर्देश स्थानपोथी तथा चरित्रातील वर्णनात कुठेच नाही. ज्या त्र्यंबकेश्वर देवळात सर्वज्ञ आल्याचा निर्देश आहे, ते देउळ गौतमाळ्याच्या उत्तरेस आहे. आणि हे देउळ गौतमाळ्याच्या पूर्वेस आहे. म्हणून या देवळाचा स्थानपोथी तथा चरित्रातील कोणत्याच स्थानाशी संदर्भ दिसत नाही ही दर्शकांनी नोंद घेणे अत्यावश्यक आहे.
कुशावर्त

कुशावर्त
दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांनी त्र्यंबकाच्या पश्चिमेस कुशावर्त येथे विहरणास बीजे केले. कुशावर्त या कुंडास दोन पटीशाळा होत्या. एक पूर्वाभिमुख आणि एक उत्तराभिमुख. या कुंडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख होते. या कुंडास असणाऱ्या पायऱ्यांची संख्या किती होती हे मात्र सांगता येणार नाही. परंतु पसरट असणाऱ्या मोठ्या पायऱ्या चार होत्या. या दोन्ही पटीशाळांवर सर्वज्ञांना आसन झाले होते.
‘‘मग कुशावर्ता बीजें केलें : कुंडीचेया उदकांत श्रीचरण घातलें : मग पश्चिमीली पटिशाळे पूर्वामुख आसन जालें :’’
‘‘तथा दुसरिये पटिशाळें तथा कमळजे आसन जालें :’’
कुशावर्ताचा जिर्णोद्धार रावजी महादेव पारनेरकरांनी केला. यातील कुंडाची जागा मात्र तीच जरी असली तरी पटीशाळांमध्ये काय बदल केला ते ओळखणे कठीण आहे. पटीशाळांची जागा जरी मूळच्याच ठिकाणी असली तरी देखील पश्चिम पटीशाळेत तथा उत्तराभिमुख पटीशाळेत कोण्या खणात, कुठे आसन झाले याचा नेमका निर्देश स्थानपोथी तथा चरित्रपाठात मिळत नाही. म्हणून येथील पटीशाळांतील स्थाने दुरून पाहावीत आणि दंडवत घालावेत. येथील कमळजा नावाचे दैवत कोण्या ठिकाणी असावे याची माहिती अजून मिळाली नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बांधकामाआधी कुशावर्त तीर्थावर घाट बांधण्याचे काम सुरू झाले होते. सन १७५० मध्ये इंदूरच्या होळकर सरदारांचे फडणवीस रावजी महादेव पारनेरकर यांनी हे काम सुरू केले. ते १७६८ मध्ये पूर्ण झाले. कुशावर्त तीर्थाच्या तीन बाजूंनी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. हे संपूर्ण बांधकाम दगडी आणि शिल्पसौंदर्याने नटलेले आहे. कुशावर्त तीर्थ हाही परंपरागत भारतीय वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. या बांधकामासाठी त्या काळात सात लाख रुपये खर्च झाला. (हें तीर्थ शके १६७२ मध्ये बांधण्यास आरंभ होऊन त्याची पूर्णता शके १६९० मध्ये झाली.)- ‘श्रीमंत नामदार जगन्नाथ शंकरशेट यांचे चरित्र’ या पुस्तकातील उतारा.
श्रीमंत रावसाहिब पारणेरकर यांनी दगडी फरशी आणि चारही बाजूंनी व्हरांडे बांधून काठे बांधली आहेत.
गंगाळे
त्र्यंबकाच्या नैऋत्येस दूर अंतरावर गंगाळे आहे. त्याच्या उत्तर काठावर (काठावर) सर्वज्ञांना आसन झाले.
‘‘गंगाळेयाचीये उतरीले पाळीवरी आसन :’’ या स्थानाविषयी दोन मतभेद आहेत. काही पोथ्यांत उत्तर काठावर, तर काही पाठात दक्षिण काठावर आसन झाल्याचा उल्लेख चरित्र पोथ्यांत आढळतो. परंतु निश्चित जागेचा निर्देश नसल्याने हे ठिकाण देखील केवळ आठवणीय आहे.
गंगासागर हा नदीच्या प्रवाहात एक मोठा तलाव आहे आणि त्याची उंची ३०० x ४०० फूट आहे. श्रीमंत राजेबहाद्दर यांनी १६७८ च्या सुमारास तो बांधला.
रामविहिरा-लक्ष्मणविहिरा

गंगाळ्याच्या पश्चिमेस डोंगराच्या पायथ्याशी पण थोडे वरती रामविहिरा आणि लक्ष्मणविहिरा नावाचे दोन कुंड आहेत. पश्चिमेकडील रामविहिरा तर पूर्वेकडील लक्ष्मणविहिरा आहे. या कुंडावर लक्ष्मीनारायणाची देउळी पूर्वाभिमुख आहे. या देवळीच्या उत्तरील आडबाजूस खडकावर सर्वज्ञांना आसन झाले. (त्याच्या उत्तर काठावरील खडकावर सर्वज्ञांना आसन झाले.)
‘‘लखुमतीर्थ लखुमीनाराएणाची देउळी पुर्वामुख : उतरीली आडवांगी खडकावरी आसन :’’ असा स्थानपोथीत येथील निर्देश येतो. आणि दुसऱ्या एका पाठात ‘‘डोंगराचे आधोपरी रामविहिरां लक्ष्मणविहिरां : तयाचे पाळी आसन :’’ असाही निर्देश येतो. अर्थात लक्ष्मीनारायणाच्या उत्तरील आडबाजूस म्हणजेच रामविहिरा लक्ष्मणविहिऱ्याच्या उत्तर काठावरील खडकावर सर्वज्ञांना आसन झाले होते असे म्हणता येईल.
या स्थानाची निश्चित जागा ठरविता येईल आणि या ठिकाणी नमस्कार करता येणे शक्य आहे.
लौकिक कथा- औदुंबर वृक्षाच्या मुळातून गंगा वाहते. हे राम-लक्ष्मण तीर्थ म्हणून ओळखले जाते. येथे रामाने काही दिवस थांबून दशरथाच्या स्मृतीप्रित्यर्थ श्राद्धविधी केला. येथे राम मंदिर आहे आणि गोपाळराव घाणेकर यांनी १८५७ मध्ये २५०००.०० रुपये खर्चून ते बांधले.)
गंगाद्वार

त्र्यंबकेश्वरात एकंदरीत पाच दिवस अवस्थान झाले. या पाच दिवसाच्या अवस्थानातील कुशावर्त, गंगाळे, रामविहिरा-लक्ष्मणविहिरा, गंगाद्वार ही विहरणस्थाने होत. राम-लक्ष्मण कुंडांच्या काठावर आसन झाल्यावर सर्वज्ञ या ठिकाणी आले.
सर्वज्ञ काळात येथील अधिष्ठित दैवतांचा ‘कोळाइ, गंगाइ आणि ‘नृसिंह’ असा उल्लेख आला आहे. स्थानपोथी आणि चरित्रातील वर्णनानुसार येथे एकूण तीन कोरीव लेणे आहेत. यात दोन पूर्वाभिमुख आहेत. आणि एक उत्तराभिमुख. पैकी दक्षिणेकडील पूर्वाभिमुख लेण्यात दोन कुंड आहेत. आणि उत्तराभिमुख लेण्यापुढेही एक कुंड आहे. सर्वज्ञ जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा प्रथम घाटावर आसन झाले. मग कोळाइच्या उजव्या हातास आसन झाले. त्यानंतर गंगाद्वारास आसन झाले. आणि त्यानंतर कोळाइच्या उत्तरेस पूर्वाभिमुख असणाऱ्या नृसिंहापुढे आसन झाले. आणि त्यानंतर सर्वज्ञांना नृसिहापुढील पटिशाळेत आसन झाले.
स्थानपोथी आणि लीळाचरित्रातील स्थानवर्णनाचा पडताळा घेतला असता तत्कालीन परिस्थिती जी लक्षात येते ती आता बदललेली आहे. ‘कोळाइ उत्तरे नृसिंह’ म्हटला आहे, आता त्या जागेवर ‘कोळाइची’ मूर्ती आहे. आज तिलाच ‘कोलांबिका’ म्हणतात. ज्या ठिकाणी कोळाइची मूर्ती होती त्या जागेवर गंगादेवीची मूर्ती आहे. आणि ज्या ठिकाणी गंगादेवीची मूर्ती होती त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे. एवढा बदल जरी झाला तरी मूळ जागा मात्र जशाच्या तशा आहेत. हा बदल कोण्या काळात झाला असेल हे सांगता येणार नाही.
येथील नमस्कार करता येतील अशी एकूण ४ ठिकाणे आहेत. सलग कोण्या एका स्थानपोथीतील वाक्यातून येथील स्थाननिश्चिती करणे अत्यंत कठिण आहे. तथापि अनेक स्थानपोथ्या आणि चरित्रपोथ्यांतील दिशानिर्देशाचा यथायोग्य क्रम लावून येथील स्थाने निश्चित करावी लागतात.
‘‘कोळाए उत्तरामुख : कोळाएपुर्वे उजवेया हाता आसन :’’ कोळाइ ही उत्तराभिमुख होती आणि तिच्या पूर्वेस उजव्या हाताला सर्वज्ञांना आसन झाले. सांप्रत स्थानपोथीत ज्यास ‘कोळाइ’ म्हणून संबोधले आहे त्या जागी गंगादेवीची मूर्ती आहे. त्या मूर्तीखाली लहान कुंड असून कुंड आणि मूर्तीच्या मध्ये गोमुख बसवले आहे. त्यातून गंगेचा उद्गम होतो.
‘‘नरसींहु पूर्वामुख :’’ ‘‘कोळाइउत्तरे नृसिंही नावेक आसन जालें : मग मढाचिये पटिशाळे बीजें केलें : तेथ पटिशाळें आसन जालें :’’ कोळाइच्या उत्तरेस नृसिंह हा पूर्वाभिमुख आहे. सांप्रत या जागेवर जी मूर्ती आहे तिला येथील रहिवासी ‘कोलांबिका’ म्हणतात. ज्या मूर्त्यांवर सात-आठशे वर्षांपासून वारंवार शेंदराचे थर चढवले जातात त्या मूर्त्यांचे आकारमान बहूधा मुळाबरहुकूम राहात नाही. काळांतराने या मूर्तीस लोकही देवीची मूर्ती समजू लागले अशी संभावना नाकारता येत नाही. त्यास दुसरे कारण असेही म्हणता येईल, त्र्यंबकेश्वराचा हा परिसर काही काळ मुस्लीम अधिपत्याखाली असल्याने येथील दैवताच्या पूजेस प्रतिबंध असावा. त्यामुळे मूर्त्यांच्या ठिकाणी जीर्णता येणे स्वाभाविक आहे. अथवा मुस्लीम राजवटीत येथील मूर्त्यांचीही नासधूस केली असावी. पुढे पेशवे काळात येथील मुर्त्या पुन्हा नव्याने बसविण्यात आल्या असाव्या अशीही संभावाना नाकारता येत नाही. येथील नृसिंहाच्या देवळासमोरील भाग हा जिर्णोद्धारीत आहे. ‘‘नरसिंहापुढें पटिसाळे आसन : एकी वासना भितरी डावेया हाता :’’ नृसिंहाच्या पुढे असणाऱ्या पटीशाळेत सर्वज्ञांना आसन झाले. आणि एका वासनेप्रमाणे नृसिंहाच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूस आसन झाले. या दोन्ही ठिकाणी आसन झाल्याचा उल्लेख काही पोथ्यांत आढळतो. ‘‘हिराइसे : नृसिहांचां देउळी आसन :॥ एकी वासना : मढाचां द्वारीं वेढे करीत असति : तेथ बडवेयाचें गाऱ्हाणें : संबोखु :॥’’ चरित्रातही प्रथम नृसिंहाच्या देवळात आसन झाल्याचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर देवळासमोरील पटीशाळेत आसन झाल्याचा उल्लेख आहे. या जागांची स्थानपोथीनुसार स्थलनिश्चिती ही आउठ हाताच्या बाहेर नसल्याने या दोन्ही ठिकाणी नमस्कार करू शकतो.
येथील स्थानपोथी आणि चरित्रातील वर्णनात गंगाद्वार, गंगादेवी, कोळाई असे उल्लेख येतात. परंतु ही तीन वेगवेगळी ठिकाणे आहेत का एकाच ठिकाणास ही नामे लागू होतात याविषयी मात्र संभ्रम निर्माण होतो. परंतु अनेक स्थानपोथ्या आणि चरित्रातील वर्णने बारकाईने वाचली असता असे लक्षात येते की, कोळाइ आणि गंगाद्वार ही दोन ठिकाणे आहेत. ‘‘कोळाए पसीमे गंगाद्वार :’’ म्हणजे कोळाइच्या पश्चिमेस गंगाद्वार आहे. अर्थात या वाक्यावरून गंगाद्वार आणि कोळाइ ही दोन्ही वेगवेगळी ठिकाणे आहेत असे सिद्ध होते. कोळाइच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख असणारं एक लेणं आहे. त्या लेण्यात दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडांच्या मध्ये ओट्यावर गणेशाची मूर्ती आहे. या जागेवरच गंगादेवीची मूर्ती असावी. या गंगादेवीपुढे सर्वज्ञांना आसन झाले होते. ‘‘गोसावी गंगाद्वारासी बीजे केले : गंगेपुढा नावेक आसन जाले :’’ याविषयी स्थानपोथीतील पुढील वाक्ये येथील ठिकाण अधिक स्पष्ट करतात. ‘‘कोळाये उत्तरीली आडवांगी भितरी उजवेया हाता आसन :’’ अर्थात कोळाइच्या उत्तरील आडबाजूस लेण्यामध्ये उजव्या हातास सर्वज्ञांना आसन झाले. म्हणजेच ही जागा गंगादेवीच्या मूर्तिपुढील स्थळ दर्शविणारी आहे. ‘‘गंगाद्वारी आसन : तें कोळाएसि उजविया हाता :’’ या वाक्यात ‘गंगाद्वारास सर्वज्ञांना आसन झाले ते कोळाइ स्थळाच्या उजव्या हातास झाले.’ वांचून कोळाइ मूर्तिच्या उजव्या हातास आसन झाले असा अर्थ कोणी करेल तर तो चूकीचा ठरेल. कारण ‘कोळाइ पश्चिमे गंगाद्वार’ म्हटले आहे. गंगाद्वारास सांप्रत गणेशापुढील जागेवर नमस्करण्यास काही हरकत नाही.
येथील लीळेचा निर्देश असा गंगाद्वारास सर्वज्ञांना आसन झाले. तेव्हा कोळाइच्या बेंबीतून पाणी निघत होते. डखल्यांनी त्या ठिकाणी बोट लावून ते पाणी थांबवले. आणि म्हणू लागले, “खाली गंगेच्या दोन्ही काठावरील गावं पुरात वाहून नेतेस, माणसं गुरं नेतेस, वासरू नेतेस, शेळ्यामेंढ्या नेतेस, शेतीवाडी नेतेस. आता माझं बोट ने बरं, मग मानलं तुला!’ सर्वज्ञ म्हणाले, ‘‘देवतेस निरोध हाईल असं बोलू नये'' डखल्याने म्हटले, ‘‘जी जी, मी काय शिव्या देत आहे? चिडवत आहे? तिथलं काय मोडत आहे? मी गोष्टी सांगत आहे. असे असताना माझाच अडथळा होत असेल तर माझेच पाप म्हणावे.’’ सर्वज्ञांनी स्मितहास्य केले. त्यानंतर सर्वज्ञांना कोळाईच्या उत्तरेस नरसिंह मठात काहीवेळ आसन झाले. आणि मग सर्वज्ञांनी नरसिंहाच्या मठात बीजे केले. तिथे आसन झाले. भक्तजनास ब्रह्मविद्या आणि देवतांविषयक शास्त्राचं निरूपण होत होते.
‘खाली पाणियां अडी भरे’ म्हणजे कोळाइ म्हणजेच गंगादेवीच्या खाली असणारा खड्डा पण्याने भरायचा. तो डखल्यांनी उपसून रिकामा केला. इतक्यात तिथला गुरव, पुजारी आला. आणि “माझे पाणी सांडले.'' म्हणून तो ओरडू लागला. तेव्हा डखले म्हणाले, “तुझे कसले पाणी! तू गुरव. तू काय गौतामाचा भाऊबंद! वंशज आहेस का? गौतम तुझा कोण लागतो? आणि आम्हाला काय लागत नाही! मग तो पुजारी सर्वज्ञांजवळ गाऱ्हाणं घेऊन आला. “पाहिलंत जी, तुमचे शिष्य गंगाद्वाराचे पाणी उपसत आहेत. त्या पाण्यामुळे आम्ही आपला परिवार पोसतो जी. त्यामुळे आम्हाला थोडीफार प्राप्ती होते. यांनी तर सर्व पाणी उपसले.' सर्वज्ञ म्हणाले, 'भटो, तुम्हाला दररोज किती मिळतात? ' त्याने म्हटले, जी जी, तीन नाणी मिळतात. कोण्या दिवशी अर्धा दाम (आठ आणे) मिळतो. कोण्या दिवशी पाऊणा दाम (बारा आणे) मिळतो.'' मग सर्वज्ञांनी बाईसांकरवी त्याला पाऊणा दाम किंवा अर्धा दाम न देता पूर्ण दाम (सोळा आणे) दिला. सर्वज्ञ म्हणाले, “बाई, एक दाम द्या.” मग बाईसांनी एक दाम दिला. डखले म्हणाले, 'हा जी, हे काय गौतमाचे भाऊबंद? म्हणून त्याला एक दाम दिला.'' सर्वज्ञांनी डखल्यास शिक्षापण केले. मग अमृतासारख्या मधूर शब्दांनी आश्वस्त केले. 'तीर्थ, देवता, पुरुषा या तिघांचा ऐसा अतं न पाहिजे कीं :'' मग डखल्यांनी, 'हो का जी.” म्हणून नमस्कार केला. ।।
(गंगाद्वारला जाण्यासाठी ७५० पायऱ्या आहेत. हे गाव मस्का येथील करमसी रणमुल्ल यांनी बांधले होते. हे काम संवत १९०७ मध्ये चैत्र १ रोजी सुरू झाले आणि चैत्र संवत १९१८ च्या ५ तारखेला सेठ हंसराज करमसी यांनी पूर्ण केले.)
त्रिमितीय मानचित्रे
ब्रह्मगीरी घाट


एके दिवशी सर्वज्ञांनी विहरणास ब्रह्मगीरीवर बीजे केले. गावाच्या दक्षिणेस दूर ब्रह्मगीरीचा घाट आहे. त्या घाटास एकूण ३६० पायऱ्या असून तीन दारवठे आहेत. त्यातील दोन दारवठे हे कोरीव आहेत. तर एक दारवठा मात्र कोरीव नाही. ‘‘ब्रह्मगिरी पाइरीया ३६० : दारवठें तीन : दोनि कोरीव : एकु नाही :’’ पहिल्या उत्तराभिमुख दारवठ्यातून सर्वज्ञांनी ब्रह्मगीरीवर बीजे केले. येथूनच ३६० कोरीव पायऱ्यांची सुरूवात होते. या दारवठ्याच्या रवणीवर सर्वज्ञ क्षण एक उभे होते.
‘‘ब्रह्मगीरीवरि बीजें करणें : उत्तरिलेनि दारवठेनि :॥ तियाचि पाइरिया :॥ तिएचि दारवठां रवणी क्षणु एकु उभे :’’
सांप्रत जिथून कोरीव पायऱ्यांची सुरूवात होते त्या ठिकाणी पहिला उत्तराभिमुख दारवठा होता. त्या दारवठ्याच्या रवणीवर सर्वज्ञ क्षणभर उभे होते. आताही या ठिकाणी रवणी आहे. ‘‘दारवठें तीन : दोनि कोरीव : एकु नाही :’’ यातील ‘एकु नाही’ म्हणजे उत्तराभिमुख असलेला दारवठा हा कोरीव नाही. परंतु तो कोरीव नाही म्हणजे तो कातळात कोरलेला नाही परंतु पाषाणांनी बांधलेला आहे असा अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. परंतु येथील पाषाणयुक्त प्रवेशद्वाराचा कोणताच मागमूस राहिला नाही. येथील रवणीवर नमस्कार करु शकतो.
(१९०८ मध्ये कराची येथील सेठ लालचंद जशोदानंद भांभानी आणि सेठ गणेशदास यांनी ४०,००० रुपये खर्च करून ५०० दगडी पायऱ्या बांधल्या.)
गौतमाळे

घाट चढल्यावर सर्वज्ञांनी गौतमाळ्यास बीजे केले. त्र्यंबकात एकूण दोन गौतमाळे आहेत. एक त्र्यंबकेश्वर देवळाच्या दक्षिणेस आणि दुसरे ब्रह्मगिरी पर्वतार आहे. पर्वतावरील गौतमाळ्याचे सर्वज्ञांनी अवलोकन केले, त्याच्या पूर्वील काठावर ईशान्य कोणट्यात उंबराचे झाड होते. त्याच्या पश्चिम बाजूस म्हणजेच उत्तर काठाची जिथे सुरुवात होते तिथे सर्वज्ञांना आसन झाले.
सांप्रत या गौतमाळ्याच्या काठांच्या मर्यादाच येथील स्थलनिश्चितीसाठी साक्ष आहेत. स्थानपोथी तथा चरित्रातील वर्णनात येथील जागेच्या निश्चितीविषयी ‘‘गौतमाळेयाचीया पुर्वीली पाळी इसान्यकोनि आश्राइत : उंबराचीए पश्चीमीली पालवीं आसन जाले :’’ हे वाक्य पुरेसे आहे. परंतु आउठ हाताच्या मर्यादेमुळे बरोबर त्याच जागेवरच पोहोचणे अवघड आहे. म्हणून सध्या या ठिकाणी दंडवत घालून लीळा आठवावी.
येथील लीळेचा संदर्भ असा, सर्वज्ञांना गौतमाळ्याच्या काठावर आसन झाले तेव्हा, उंबराच्या झाडावरील फळे पिकून खाली पडली होती. सर्वज्ञ भक्तीजनांना म्हणाले, ‘ही उंबरे वेचा’ म्हणून सर्वच भक्तीजनांनी ती उंबरे वेचून राशी केल्या. मग बाइसांनी त्यातून पाचेक उंबरे निवडून सर्वज्ञांना ओळगविली. त्यातील एक उंबर सर्वज्ञांनी श्रीकरात घेऊन म्हणाले, ‘ब्रह्मांडीय गोलक तो असा असतो. हे एक ब्रह्मांड आहे.’ तेव्हा भक्तजनांनी म्हटले, ‘जी जी ब्रह्मांड ते कसे असते?’ सर्वज्ञे म्हणाले, ‘‘जसे हे उंबर बियांनी भरलेले आहे तसेच जीव या ब्रह्मांडात भरलेले आहेत. म्हणून यास ब्रह्मांड असे म्हणावे. आणि जशी उंबरास पुष्कळ उंबरं लागलेली आहेत तशीच अनंत ब्रह्मांडे मायेस लागलेली आहेत. ”जी जी.’’ म्हणून भक्तजनांनी श्रीचरणावर मस्तक ठेवले.
सर्वज्ञ म्हणाले, ‘‘न फोडता उंबर असे खावे.'' म्हणून सर्वज्ञांनी एक अख्खे उंबर श्रीमुखात घातले. आरोगण केले. सर्वज्ञांनी कृपादृष्टीने अवलोकन करून म्हटले, ‘‘काय महात्मे हो ‘‘पिंडप्रदान वर्तेना!’’ (श्राद्धकाळी मृतदेहाला दिला जाणारा भाताचा गोळा, वाक्प्रचार आहे. अर्थात आता खायला सुरवात का करू नये).' आणि सगळ्या भक्तजनांनी पोटभर उंबर खाल्ली. चवीला साखरेसारखी उंबरं लागत असल्याने भक्तजन तृप्त होईपर्यंत खातच होते. सर्वज्ञ म्हणाले, “आता पुरे करा रे. नाहीतर सर्वांची पोटं दुखतील.'' मग त्यांनी खाल्ली नाही. सर्वज्ञ म्हणाले, ‘‘यावर दोन चूळा पाणी प्या.'' “हो का जी.’’ म्हणून पाणी प्यायले. मग सर्वज्ञांनी तिथून बीजे केले. ।।
गौतमाच्या भातवड्या, सीतेचे कोथळे मोथळे

गौतमाळ्याच्या काठावर विहरण झाल्यावर सर्वज्ञ पुढे ब्रह्मगिरीवर निघाले. जाताना रस्त्यात पुढे ब्रह्मगिरीच्या डोंगराच्या खालच्या बाजूस दोन टाके आहेत. त्याच्या पश्चिम बाजूस सर्वज्ञ उभे राहिले आणि येथून सर्वज्ञांनी गौतमाच्या भातवड्या आणि सीतेचे कोथळे मोथळे दाखवले.
गौतमाच्या भातवड्या आणि सीतेचे कोथळे मोथळे दाखवणे या स्थानाविषयी स्थानपोथी तथा चरित्रपाठात मुख्यत: तीन मतभेद आढळतात. त्यामुळे या स्थानाची निश्चिती करणे कठीण आहे. काही स्थानपोथ्यांत भातवड्यांचा निर्देश ‘‘तळेया दक्षिणे गौतमाचिया भातवडीया : चरणचारीं उभयां राहुनि अनुमोदन : तथा कोथळे :’’ अशाप्रकारे येतो. आणि काही स्थानपोथ्यांत ‘‘ब्रह्मगिरीखाली दारवठा भातखळें :’’ असा निर्देश येतो. आणि लीळाचरित्रातील काही पाठात ‘‘गोसावी जातजातां टांकेयापासी समीप उभे राहीले : मग सर्वज्ञे म्हणितलें : ‘‘देखीलीया गा या पैली गौतमाचीया भातवडीया :’’ यातील ‘टाकेयापासी समीप उभे राहीले’ हे वाक्य इतर पाठात ‘टांकेयापासि पसिमे उभे राहिले’ असे आहे. त्यामुळे ही जागा या पाठाप्रमाणे अगदी निश्चित ठरते.
ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चढून आल्यानंतर वर पाठाराचा भाग आहे. आणि त्यापुढे ब्रह्मगिरी पर्वत आहे. या पाठाराच्या सुरूवातीस दोन रस्ते फाकतात. एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे. यातील पूर्वेस जाणाऱ्या रस्त्याने काही अंतरावर गौतमाळे आहे आणि पश्चिमेकडे ब्रह्मगिरीवर जाणाऱ्या रस्त्यावर पुढे काही अंतरावर दोन टाके आहेत. या टाक्याच्या पश्चिमबाजूस जवळच सर्वज्ञ उभे राहिले आणि गौतमाच्या भातवड्या दाखवल्या. अर्थात या पाठानुसार या स्थानाच्या निश्चितीत काही शंका नाही.
‘‘ब्रह्मगिरीखाली दारवठा भातखळें :’’ आणि ‘‘दारवठा रिगतां पुढें गोतमाचिया भातवडीया दाखवणें :’’ स्थानपोथीतील ही वाक्ये गोंधळात टाकणारी आहेत. परंतु याचे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, ‘दारवठा भातखळे’ म्हणजे दारवठा असणाऱ्या परिसरातील भातखळे. त्याचप्रमाणे ‘दारवठा रिगतां पुढे गौतमाचीया भातवडीया’ या वाक्यातही दारवठ्यात शिरण्याच्या आधी पुढे गौतमाच्या भातवड्या दाखवल्या असा अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. जर दारवठा असणाऱ्या परिसरातील भातखळे असा अर्थ केला तर या स्थळाचे दोनच पाठभेद म्हणता येतील. अर्थात हे दोन पाठभेद म्हटले तर यातील ‘‘टांकेयापासी समीप उभे राहीले : मग सर्वज्ञे म्हणितलें : ‘‘देखीलीया गा या पैली गौतमाचीया भातवडीया :’’ हा पाठभेद निश्चित स्थळ दर्शवणारा आहे, तर दुसरा ‘तळेया दक्षिणे गौतमाच्या भातवडीया’ हा पाठभेद मात्र दिशानिर्देश जरी बरोबर करीत असला तरी यातून निश्चित स्थलनिश्चिती होत नाही.
‘दारवठा भातखळे’ या वाक्याचा अर्थ करताना ब्रह्मगिरीहून खाली उतरताना दावठ्यात जी दोन कोहके आहेत त्यांना इथे भातखळे म्हणून संबोधले आहे. असाही अर्थ कोणी करू शकतो. परंतु तसा अर्थ करण्यास कोणत्याच पाठातील उपोद्बलक असे वाक्य आढळले नाही. जर त्यास उपोद्बलक वाक्य आढळले तर हा तिसरा पाठभेद म्हणावयास काही हरकत नाही.
‘त्या परिसरातील भातखळे’ असा अर्थ करण्यामागे एक कारण असेही आहे. चरित्र पाठातील वर्णनानुसार सर्वज्ञ ब्रह्मगिरी पर्वतावर आले तेव्हा प्रथम गौतमाळ्याकडे गेले. त्यानंतर पुन्हा वरील पर्वत चढून गुप्त त्र्यंबक, आदि त्र्यंबक या ठिकाणी गेले. आणि मग परतताना ब्रह्मगिरीच्या सोंडीवर आल्यावर भक्तजनांना समुद्र दाखविला. त्यानंतर ब्रह्मगिरीच्या वरील पर्वताहून खाली आले आणि या पठारावर सर्वज्ञांनी गौतमाच्या भातवड्या आणि सीतेचे कोथळे मोथळे दाखवले. आणि यानंतर ब्रह्मगिरीचा खालील पर्वत उतरले. जवळजवळ सर्वच चरित्र पोथ्यांत असाच क्रम आहे. म्हणजेच खाली उतरल्यानंतर गौतमाच्या भातवड्या दाखवल्या असे कोणत्याच पाठातील वाक्यावरून सिद्ध होत नाही. म्हणून ‘दारवठा भातखळे’ आणि ‘दारवठा रिगता पुढे गौतमाचीया भातवडी’ या वाक्यांचा अर्थ करताना विचारपूर्वक करावा लागेल.
समुद्र दाखवणे

गौतमाळ्याकडून सर्वज्ञांनी पुढे पर्वत चढून गुप्त त्र्यंबकाकडे बीजे केले. परतताना या उंच खडकाळ जागेवर पश्चिमेकडे श्रीमुख करुन उभे राहिले आणि बाइसांसमवेत सर्व भक्तीजनांना समुद्र दाखवला. या स्थळाविषयी स्थानपोथ्यांत वासनाभेद जरी दिसत असले तरी त्यांना या एकाच स्थळाचा निर्देश करावयाचा आहे. ‘‘ब्रह्मगिरीचीए' सोंडियेवरि गोसावी उभे राहिलें : आणि अवघेया भक्तीजना स्थिती संचरली :’’ म्हणजे सर्व भक्तजनांना स्थीती संचरुन समुद्र दाखवला. यातील ‘ब्रह्मगीरीचिये सोंडीयेवरी गोसावी उभे राहिले’’ हे वाक्य महत्वाचे आहे. ही सोंडी म्हणजे कोण्या देवळाची नव्हे तर पर्वतास असणारा सोंडीसारखा आकार निमुळता होऊन संपतो त्या टोकाला येथे सोंडी म्हटले आहे. दुसऱ्या पोथीतील वाक्यानेही या स्थळाची निश्चिती होते. ‘‘एक म्हणेति गोऱ्हे पाठारावरुनि बाइसां समुद्र दाखवणें :’’ गोऱ्हा असं गाईच्या नर वासरास म्हणतात. त्या वासराच्या मानेवरील उंचवट्याचा (वशिंडाचा) आकार ज्या पाठारावर आहे. त्यास गोऱ्हे पाठार असे म्हणत असावेत. आणि येथील उत्तरेकडील निमुळत्या पर्वताचा आकार देखील असाच आहे. अर्थात दक्षिणेकडील पर्वताच्या उतरत्या भागास आकारावरून सोंडी म्हटले आहे. तर उत्तरेकडील पर्वताचा आकार आणि त्याच्या निमुळत्या भागावरील पाठार मिळून गोऱ्हेपाठार हा शब्द योजला आहे. म्हणजेच दोन्ही पर्वताच्या निमुळत्या भागांच्या मध्ये जे पाठार आहे. ती जागा ‘समुद्र दाखवणे ही होय. तसेच आणखी एका चरित्रातील वाक्यावरून या जागेची स्पष्टता होऊ शकते. ‘‘जी जी : हें उच एवढें तरि एथौनि समुद्र दीसैल कीं :’’ अर्थात गुप्त त्र्यंबकावरील मार्गात हीच एक उंच जागा आहे. म्हणूनही या लीळेची निश्चिती या जागेवरच होऊ शकते. ‘समुद्र दाखवणे’ ही लीळा गुप्त त्र्यंबकावरून येताना घडली असा लीळाचरित्र तथा स्थानपोथीत निर्देश आहे.
सांप्रत हे ठिकाण स्थानपोथी तथा चरित्रातील दिशानिर्देशाद्वारे सिद्ध जरी करू शकत असलो तरी ती सिद्ध केलेली जागा आउठ हात मर्यादेपेक्षा जास्त असल्याने नेमकी हीच ती जागा आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणीही दंडवत घालून लीळा आठवावी.
गुप्त त्र्यंबक-आदि त्र्यंबक

गुप्त त्र्यंबक

गुप्त त्र्यंबक


आदि त्र्यंबक

आदि त्र्यंबक
ब्रह्मगिरीच्या सोंडीवरून सर्वज्ञांनी गुप्त त्र्यंबकाकडे बीजे केले. सांप्रत या देवळास ब्रह्मगिरी मंदिर या नावाने संबोधले जाते. हेच ते गुप्त त्र्यंबकाचे देऊळ होय. याविषयी स्थानपोथीतील निर्देश असा आहे. ‘‘ब्रह्मगिरी पश्चिमे गुप्त त्र्यंबक : तेथ गोसावी बीजें केलें :’’ ब्रह्मगिरी पर्वताच्या पश्चिम बाजूस गुप्त त्र्यंबकाचे ठिकाण आहे हे या वाक्यावरून सिद्ध होते. परंतु गुप्त त्र्यंबकाचे देऊळ हेच आहे असं स्थानपोथीतल्या पुढील वाक्यावरून सिद्ध होते. ‘‘गुपीत त्रीयंबकु : दोन्ही दारसंका : देउळ पुर्वामुख : डावेया हाता आसन : पुढें गंगा जमुना टाकीं दोनी आहाती :’’ यातील शेवटचे वाक्य, ‘‘पुढे गंगा जमुना टाके दोनी आहाती :’’ हे महत्वाचे आहे. सांप्रतही या देवळासमोर दोन टाके आहेत. तेच हे गंगा-जमुना टाके होत. या दोन्ही टाक्यांचा स्थानपोथीकारांनी खूण म्हणून निर्देश केला आहे, स्थान म्हणून नाही.
गुप्त त्र्यंबकाच्या देवळातील स्थान निर्देश ‘‘मग गोसावी गुपीत त्रीयंबकासि बीजे केलें : टांकेया पसीमीली कांठीं लोंबतां श्रीचरणी नावेक आसन जालें :’’ अर्थात देवळासमोरील टाक्याच्या पश्चिम काठावर सर्वज्ञांना लोंबता श्रीचरणी आसन झाले होते. या स्थळावरील स्थानपोथीतील आणि चरित्रातील दिशानिर्देश हे तंतोतंत जूळणारे आहेत म्हणून या ठिकाणी आपण नमस्कार करावा.
येथून पुढे दक्षिणेस सर्वज्ञांनी अदित्र्यंबकास बीजे केले. ज्या ठिकाणास सांप्रत ‘मूळगंगा’ म्हणून संबोधले जाते. ‘‘मग गोसावी तेथौनि बीजें केलें : आदित्रियंबका बीजें केलें : तेथ नावेक कुंडापासी आसन जालें :’’ यात कुंडापासी आसन झाले एवढाच निर्देश असल्याने कुंडाजवळ नेमके कोणत्या दिशेस आसन झाले हे मात्र नमूद केले नसल्याने निश्चित स्थाननिश्चिती होत नाही. त्यामुळे इथे दुरून हात जोडावे इतकेच!